अजित पवारांविरुद्ध लढण्यासाठी शिवतारे शिवसेना सोडणार? काय म्हणाले शिवतारे

मुंबई : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याचा निर्धार पक्का व्यक्त केला आहे. यासंधार्बत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, वेळ पडल्यास आपण कमळ चिन्हावरही लढू असंही शिवतारे यांनी म्हटलं आहे. अपक्ष लढण्यापेक्षा कमळाच्या चिन्हावर लढणं चांगलं असंही शिवतारे यांनी म्हटलं आहे. पण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत एकत्र असल्याने शिवतारेंच्या भूमिकेवर वारंवार आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे यानंतर विजय शिवतारे काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशातच माध्यमांशी  बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले विजय शिवतारे ?
विजय शिवतारे शिवसेनेतून बाहेर पडणार का?, असा प्रश्न  विचारला असता, त्यावर विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे. माझा एकनाथ शिंदे यांचं घनिष्ठ नातं आहे. दोन चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मला तर लोकसभा निवडणूक लढायचीच आहे. महायुतीत आपल्याला जागा तर सुटणार नाही. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय… 25 वर्षाची सोबत आहे ती असणार आहे ना… मी लोकसभेत विजयी होणार हे दैदिप्यमान यश असेल, असं विजय शिवतारे म्हणाले