नवी दिल्ली : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची उमेदवारी यूपीएससीने रद्द केली होती. त्यानंतर गुरुवारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीनही कोर्टाने फेटाळून लावला. त्यामुळे तिला कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता ती फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पूजा खेडकरने खोटे प्रमाणपत्र सादर करून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसेच केवळ ८ वेळा यूपीएससी परिक्षा देण्याची मुदत असताना तिने तब्बल ११ वेळा नाव बदलून परिक्षा दिली. त्यानंतर पुण्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर अवाजवी मागण्याही केल्या. तेव्हापासूनच ती चर्चेत आली.
याबाबतचा तपास करून यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली. तसेच भविष्यात पूजा खेडकरला कुठलीही युपीएससीची परीक्षा देता येणार नसल्याचेही यूपीएससीने म्हटले. त्यानंतर पूजा खेडकरने कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला.
त्यामुळे पूजा खेडकरला कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता ती फरार असल्याचे बोलले जात आहे. पूजा खेडकर परदेशात पळून गेल्याचीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, तिच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.