जळगाव : दोन गटातील चार अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आल्याने झालेल्या वादात एकान गावठी पिस्तूल काढून दहशत निर्माण केल्याचा प्रकार गुरूवार, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील स्वातंत्र्य चौकातील हॉटेल रूपाली समोर घडला. यावेळी शहर वाहतूक पोलीसांच्या लक्षात आल्याने त्यांनी चौघांसह दोन वाहने, गावठी पिस्तूल जप्त केले असून जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील हॉटेल रूपाली समोर कार क्रमांक (एमएच १८ बीआर ९००९) आणि दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईसी ६७२८) वर बसलेले दोन गटातील गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे, सोन्या उर्फ सोनू गणेश चौधरी, चेतन उर्फ भैय्या रमेश सुशीर आणि अतुल कृष्ण शिंदे हे अट्टल गुन्हेगार दोन गटात एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही वाहने थांबवून वाद निर्माण झाला. यातील एकाने गावठी कट्टा काढून रोखण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान स्वातंत्र्य चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेवून वाद मिटवत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाहने घेवून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान हा वाद का झाला हे अद्याप समोर आलेले नाही.
स्वातंत्र्य चौकातून एका मोर्चा जात असताना शहर वाहतूक शाखेचे सपोनि देविदास इंगोले, सपोनि गणेश बुवा, कर्मचारी तुषार जावरे, योगेश पाटील, महेश महाले, सुनिल तडवी, नरसिंग पाडवी, विकास पवार, रवि पाटील, मन्साराम महाजन, किरण मराठे हे ड्यूटीवर असताना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर चौघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील दोन्ही वाहने व गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.