नवी दिल्ली : जगातील नऊ देशांकडे अणुबॉम्ब आहेत. हे अणुशक्ती संप्पन देश आपल्या क्षमतेत सातत्याने वाढ करत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीत एकेकाळी पाकिस्तानच्या मागे असलेल्या भारतानेही आपला साठा वाढवला आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, इस्रायल आणि पाकिस्तानच्या अणुसाठ्यात गेल्या वर्षभरात कोणतीही वाढ झालेली नाही. भारताने गेल्या एका वर्षात आपल्या अण्वस्त्रसाठ्यात आठ ने वाढ केली आहे. या बाबतीत चीनचा वेग सर्वाधिक आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
भारताने आपल्या शेजारी पाकिस्तानला अण्वस्त्रांच्या बाबतीत मागे टाकले आहे. पाकिस्तानकडे एकूण १७० अण्वस्त्रे आहेत. भारताकडे आता त्यापैकी १७२ अण्वस्त्रे आहेत. अण्वस्त्रांच्या बाबतीत भारत उत्तर कोरिया आणि इस्रायलच्याही पुढे आहे. त्याचबरोबर भारताकडे सध्या चीनच्या तुलनेत ३२८ अण्वस्त्रे कमी असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.
विस्तारवादी चीनच्या अण्वस्त्रांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तैवान आणि भारत यांच्यातील तणावादरम्यान चीनने गेल्या एका वर्षात ९० अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे चीनने अनेक शस्त्रे हाय ऑपरेशनल अलर्ट मोडवर ठेवली आहेत. चीनने प्रथमच असे केले आहे. गेल्या वर्षीच्या सिप्रीच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये चीनकडे ४१० अण्वस्त्रे होती. पण २०२४ मध्ये हा आकडा ५०० वर पोहोचला आहे.
भारत अण्वस्त्रांच्या संख्यामानाने चीनच्या मागे असला तरी आता भारताचे लक्ष लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रावर आहे. यामध्ये संपूर्ण चीनचा ताबा घेऊ शकतील अशा शस्त्रांचाही समावेश आहे. याशिवाय भारत बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर अनेक शस्त्रे तैनात करण्याच्या क्षमतेवर काम करत, असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.