अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला: चित्रा वाघ यांचा टोला

मुंबई : अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप केला होता. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

चित्रा वाघ म्हणाल्या की, “सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. त्याने याबद्दलचे पुरावे गृहखात्याकडे दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी केली जावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

“निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेविषयी बोलताना भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. त्यामुळे आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिक माहिती देतील का?” असा सवालही त्यांनी केला आहे.