मुंबई :“अनिल देशमुख यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिन वाझे यांच्याबद्दल अनिल देशमुख काय बोलतात? आमच्यावर केलेल्या आरोपाबाबत ते काय बोलतात? याचा माझ्याकडे पुरावा आहे. जर वेळ आली, तर मला ते उघड करावे लागेल. जर रोज खोटे बोलून कुणी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही”, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २४ जुलै रोजी दिला.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “अनिल देशमुख सातत्याने माझ्यावर आरोप करीत आहेत. पण, मी आजवर बोललो नव्हतो. कारण मी कुणावरही डुख धरून राजकारण करीत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही, पण कुणी माझ्या नादी लागले तर सोडत नाही”, असा हल्लाबोल त्यांनी केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, “श्याम मानव हे मला बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. माझ्यावर इतके मोठे आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवे होते. पण दुर्दैवाने इकोसिस्टिममध्ये अलीकडे सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव हे त्यांच्या नादी लागले आहेत का? असा प्रश्न मला पडतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला
अनिल देशमुख अद्याप दोषमुक्त झालेले नाहीत
अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप आमच्या सरकारच्या काळात नाही, तर मविआच्या काळात झाले होते. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आले. मुख्य न्यायाधीशांनी अनिल देशमुख यांच्यावर ‘एफआयआर’ दाखल करायला लावला आणि मग देशमुख तुरुंगात गेले. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले आहेत. ते दोषमुक्त झालेले नाहीत, अशी आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.