जळगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव पथकाने बुधवारी मुक्ताईनगर बोदवड रोड, बोदवड शहराजवळ सापळा रचलेला होता. त्यासुमारास संशयित वाहन क्र. एम.एच.१९ ७८८८ या वाहनाला प्रतिबंधीत अन्न पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन् थांबविले. त्यात ७ लाख २८ हजारांचा सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला. अन्न प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याचे नाव अभिषेक ज्ञानेश्वर बारी, रा. जाम नेर, असे सांगितले. त्या वाहनाची थांबवून पाहणी केली असता त्याम ध्ये पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन्न पदार्थाचा साठा आढळून आल्यामुळे बोदवड पोलीस स्टेशन येथे आणून पानमसाला व सुगंधीत तंबाखू यांचा वाहनासह एकूण साठा ७ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन वाहनचालक, क्लिनर, वाहन मालक व साठा मालक व पुरवठादार बोदवड पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हयामधील मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गुटख्याविरुद्ध तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव संतोष कांबळे यांनी दिली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार व त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी. के.एच. बाविस्कर, आ.भा. पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे व मा. सह आयुक्त, (नाशिक विभाग) सं.भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.