यावल : तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचारातून मुलाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. अत्याचार करणाराही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आई-वडील आणि भाऊ हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात.
गेल्या वर्षभरापासून अल्पवयीन मुलीने शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे ती घरीच राहत होती. एक अल्पवयीन मुलगा मुलीला काहीतरी आमिष दाखवत गेल्या वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार करत होता. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली.
गेल्या दिड महिन्यापूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमात मुलीच्या चालण्या बोलण्यावरून तिच्या आईवडीलांना संशय आला. अधिक चौकशी केली तसंच तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार तिला शुक्रवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी पिडीत अल्पवयीन मुलीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता बाळाला जन्म दिला.
याप्रकरणी मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.