चोपडा ः तालुक्यातील घोडगावातील 29 वर्षीय अविवाहित तरुणाने आलेल्या नैराश्यातून स्वतःलाच पेट्रोल टाकून जाळले, मात्र चोरट्यांनी पेट्रोल टाकून जाळल्याचा बनाव केल्याने यंत्रणेवर चांगलाच ताण वाढला, मात्र जवाबातील तफावत व सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी सत्यता उजेडात आणल्यानंतर तरुणाने स्वतःलाच जाळल्याचे समोर आले. भूषण दिलीप पाटील (वय 29, रा.घोडगाव) असे मयताचे नाव आहे.
लुटल्याचा केला बनाव
तालुक्यातील घोडगाव येथे भूषण पाटील अविवाहित तरुण शेती काम करून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. 11 रोजी तो चोपडा येथे आला होता. परंतु सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. सायंकाळच्या सुमारास बाटलीत पेट्रोल घेऊन तो धरणगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ आला. बुधवारी रात्री त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. काही क्षणातच भूषण पूर्णपणे भाजला गेल्याने त्याने अंगाची होणारी लाहीलाही कमी होण्यासाठी शेजारीच असलेल्या पाटचारीच्या पाण्यात उडी घेतली आणि रात्रभर तो पाटचारीतील पाण्यातच बसून राहिला. गुरुवारी सकाळी पाटचारीजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाईलवरुन भूषण नातेवाईकांसोबत संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी त्याने आपल्याला चोरट्यांनी माझ्याकडील रक्कम लूटून घेत पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे सांगितले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या भूषणला तत्काळ चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
पोलीस अधीक्षकांनी दिल्या तपासाच्या सूचना
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील, चोपडा शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्यासह एलसीबीच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पथकाला या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपासाबाबत सूचना दिल्या.
सीसीटीव्ही फुटेज पाहून ‘भूषण’चा खोटेपणा उलगडला-पो.नि. के.के.पाटील
जखमी भूषणने स्वतःच जाळून घेतले असलेतरी चोरट्यांनी मारहाण करीत लुटल्याची पेटवून दिल्याची कबुली दिली होती. मात्र जवाबातील तफावत व सीसीटीव्ही फुटेजनंतर पोलिसांनी प्रकरणाची सत्यता उजेडात आणली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तरुण स्वतःच बाटलीत पेट्रोल घेत असल्याचे कैद झाल्याचे दिसून येताच त्याने स्वतःच पेटून घेतल्याची खात्री पोलिसांना झाल्यानंतर संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी भूषणला सहानुभूती आणि विश्वास घेत त्याची पुन्हा चौकशी केली. यामध्ये त्याने पोलिसांना सत्य हकीकत सांगत आपणच स्वतःला जाळून घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे भूषणने मृत्यूपूर्वी दिलेल्या कबुली जबाबामुळे पोलिसांनीदेखील सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास तरुणाची प्राणज्योत मावळली, असे शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी सांगितले.