नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना मंगळवारी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्याने भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी निराशा व्यक्त केली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या मते, पावसाळ्यात मैदान पूर्णपणे झाकणे आवश्यक आहे. पण हे इथे दिसले नाही. पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही पण मध्येच पाऊस थांबला तरी मैदान सामना सुरू करायला तयार नव्हते.
स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलदरम्यान बोलताना गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. जगभरातील क्रिकेट स्टेडियममध्ये पाऊस पडल्यास संपूर्ण मैदान का झाकले जात नाही, असा सवाल त्यांनी केला. अतिरिक्त कव्हर्स खरेदी करून मैदान पूर्णपणे झाकण्यासाठी क्रिकेट बोर्डाकडे निश्चितच पुरेसा पैसा आहे आणि अशी परिस्थिती टाळता येईल, असे गावस्कर म्हणाले. इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या विश्वचषकाची आठवण करून देताना गावस्कर म्हणाले की, या स्पर्धेतील अनेक सामने पावसामुळे खेळता आले नाहीत. कारण पाऊस थांबूनही बाकीचे मैदान झाकले गेले नव्हते.