जळगाव : शहरात मुख्यालयी जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दैनंदिन तापमान तसेच साप्ताहिक तापमानासह हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दर्शविला जातो. या सप्ताहात जळगाव शहरात फटाक्यांच्या प्रदूषणापेक्षा खराब नादुरुस्त रस्त्यांच्या धुळीमुळे प्रदूषणाचे प्रमाण उच्च पातळीवर असल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हवेचा प्रदूषण निर्देशांक 320 पर्यत नोंदवला गेला आहे.
पत्रकार परिषदेत आमदारांनी केली मागणी :
शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण शक्य नसेल तर किमान लवकरात लवकर दुरुस्ती करावी . इ नागरिकांची या धुळीपासून मुक्तता करावी. अशी मागणी दोन दिवसापूर्वी आ.भोळे यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे . मात्र मनपा प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
दीपोत्सवा दरम्यान व त्यानंतर या सप्ताहात जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. लक्ष्मीपूजनासह नंतरच्या कालावधीत हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक आढळले. या काळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातदेखील वाढ झालेली निदर्शनास आली. गत वर्षाच्या तुलनेत हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली यावर्षी हवेतील प्रदूषणासह ध्वनीप्रदूषण पातळीत बरीच वाढ झाल्याचे दिसते.
जिल्ह्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी अजय चव्हाण, उपपर्यावरण अधिकारी किरण मोहिते आणि ज्युनियर केमिस्ट यांच्या पथकाने हवेच्या गुणवत्तेचा आणि ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास केला. हरित फटाक्यांचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण चव्हाण यांनी नोंदविले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. त्यात यावर्षी न्यायालयाच्या निर्देशानुसार हरित फटाक्यांचा वापर अधिक झाल्याने काही प्रमाणात प्रदूषण कमी आहे.
दिवाळीनिमित्त वाजवण्यात येणार्या फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याची ओरड दरवर्षी होत असते. मात्र दिवाळीच्या फटाक्यांमधून निघणार्या धुरापेक्षाही अधिक प्रदूषण सध्या शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यावरून उडणार्या होत आहे. जळगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था व खड्ड्यांमधून प्रचंड धूळ उडत आहे. ज्याचा त्रास वाहनचालकांसोबतच वाहतूक नियंत्रण करणार्या पोलिसांनाही होत आहे. या धुळीमुळे वाहनचालकांबरोबरच प्रवासी व वाहतूक पोलिसांना या धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील अंतर्गत विविध परिसरात धुळयुक्त रस्ते, डिझेल वा अन्य इंधनावर धावणारी वाहने यांच्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. दिवाळीपूर्वी स्वच्छ व निर्भेळ हवेचा निर्देशांक 125 ते 135 होता. तो दिवाळीनंतर गेल्या पाच सात दिवसात जवळपास 200च्या आसपास नोंदवला गेला. परंतु सद्य:स्थितीत तो धुळयुक्त रस्ते वा वाहनांच्या प्रदूषणामुळे 320 पर्यत नोंदवला गेला आहे. स्वातंत्र्य चौकात पर्यावरणविषयक माहिती दर्शविणारा तक्ता नव्यानेच बसविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रदूषण नियंत्रण विभागाने दिली.