अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका, ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पहूर : गावातील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चौधरी हा बी.एस्सी.चे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. शनिवारी दुपारी तो अभ्यासिकेत अभ्यास करीत होता.याचवेळी त्याच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्याला तातडीने खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांनी जामनेर येथे नेण्याचा सल्ला दिला. परंतु जामनेर येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

राहुल याची घरची परिस्थिती जेमतेम आहे. मोठा भाऊ सागर चौधरी हा जामनेर आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी अधिकारी बनण्याचे राहुल याचे स्वप्न होते. यासाठी तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला होता. त्याच्या अकाली निधनाने परिवाराला मानसिक धक्का बसला आहे. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.