भटेश्वर वाणी
जळगाव : शहरातील मालमत्ताधारकांच्या करात झालेल्या अवाजवी वाढीसंदर्भात अमरावती येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करवाढीला स्थगिती दिल्याने भाजप – शिंदे सरकार व आमदार रवी राणांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले. यावरूनच अमरावतीत स्थगिती जळगावचे काय? असा प्रश्न आता जळगावकरांनीही उपस्थित केला आहे. दिवसभर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असताना नागरिकांनाही हा प्रश्न पडला.
अमरावतीमध्ये झालेल्या एका बैठकीदरम्यान आ. राणांनी मालमत्ता करांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्समध्ये केलेल्या वाढीला विरोध न दाखविता जी वाढ आहे, ती योग्य मात्र ती एकदम न करता टप्प्या-टप्प्याने केली जावी, अशा सूचना केल्या. तसेच केलेली वाढ स्थगित करावी, असे निर्देश दिले. 20 वर्षात वाढ केली नाही व आता एकदम भुर्दंड देणे कितपत योग्य असा सवालही त्यांनी प्रशासनाला केला व टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा अशी सूचना केली.
वीस वर्षाचा असेसमेंट जर एकत्रित झालं तर त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात वाढ होईल. उत्पन्न तर पाहिजे पण लोकांच्या डोक्यावर बसून उत्पन्न घेता येणार नाही. आज तर लोक अडचणीत आहेत. कोरोनामुळे आर्थिक अडचणी आल्या आहेत. दुप्पट टॅक्स वाढवू तर लोकांनी पैसे द्यायचे कुठून, लोकांची घरे सील करणार आहे का ? लोकांचे घर विकणार आहे का? आम्ही जे निर्णय घेतो ते लोकाभिमुख येतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी अमरावती मनपाच्या निर्णयाबाबत निर्णय घेतला.
जळगावात रंगली चर्चा
अमरावतीच्या निर्णयाबाबत जळगाव शहरात दिवसभर चर्चा रंगली होती. यात सोशल मीडियावर आजी-माजी नगरसेवकांमध्ये वादही सुरू झाले. अमरावतीप्रमाणे जळगाव मनपानेही 20 वर्षानंतर प्रॉपर्टी टॅक्स वाढविला. अमरावतीत रस्ते चांगले आहेत, सुविधा मिळतात तरीही तेथे स्थगितीचा निर्णय झाला, जळगावचे काय? असा सवाल अनेकांनी करून नगरसेवकांनीच पुढाकार घेऊन प्रॉपर्टी टॅक्सबाबतचा निर्णय शासनास विनंती करून स्थगित करावा व टप्प्या-टप्प्याने करवाढ करावी, अशी अपेक्षा दिवसभर अनेक जण व्यक्त करत होते. जळगाव महापालिकेत अशी हिंमत कोणता पक्ष दाखवितो… यावरही दिवसभर सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.
40 टक्के मालमत्ता कर अमरावती महानगरपालिकेने वाढवला होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आले असता त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यावर त्यांनी नागरिकांच्या भावना समजून घेत स्थगिती देत, मागील वसुली करण्याचे सांगितले.
-आ.रवी राणा,
अमरावती
जळगाव महानगरपालिकेने फेरमूल्यांकन प्रक्रिया केल्या. त्यात कराचे दर वाढवले नाही. फक्त मालमत्ता नव्याने मोजमाप केली. मोजमापात झालेली दुरुस्ती केली. वापरात झालेला बदल, पहिल्या मोजमापात झालेला बदल या सर्वांची तपासणी केली.
– प्रशांत पाटील, उपायुक्त
मनपा जळगाव.