अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर जम्मू काश्मीर मध्ये ‘झिरो टेरर प्लॅन’ लागू

आदेश जारी होताच तातडीनं त्याची अंमलबजावणी… पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत.

जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया पाहता केंद्रातून आता यामध्ये लक्ष घालण्यात सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात जम्मू- काश्मीर इथं सीमेपलिकडून होणारी घुसखोरी आणि तत्सम कट कारस्थांनांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालेलं असतानाच अचानक या घटना वाढल्या आणि अखेर आता देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लष्करी अधिकाऱ्यांसह उच्चस्तरिय बैठक घेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यावेळी अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना वेसण घालण्यासाठी आणि कटकारस्थानं हाणून पाडण्यासाठी इथं झिरो टेरर प्लॅन लागू करण्याचे निर्देश दिले. त्यांचे निर्देश मिळतात तातडीनं त्याची अंमलबजावणीही सुरु झाली.

सक्तीचे निर्देश
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीविषयी हाती आलेली सविस्तर माहिती पराहिल्यानंतर इथं दहशतवादविरोधी मोहिम आणखी सक्तीनं राबवण्याच्या सूचना आणि संकेत शाह यांनी या बैठकीदरम्यान दिले. पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार इथं आता कठोर पावलं उचलली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. परिणामी येत्या काळात जम्मू काश्मीरमध्ये सर्वच हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असून, प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची या भागावर करडी नजर असणार आहे हे स्पष्ट होत आहे. या भागात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या कारवाईचे संकेतही मिळत आहेत.

दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक इथं शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे उपराज्य्पाल मनोज सिन्हा, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, होऊ घातलेले लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर यंत्रणेचे संचाकल तपन डेका, सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंह, बीएसएफ महासंचालक नितीन अग्रवाल, जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक आर.आर.स्वैन आणि सुरक्षा दलातील इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एनडीए सरकार दहशतवादाशी दोन हात करत तो समुळ नष्ट करण्यासाठी तत्पर असल्याचं आश्वासक वक्तव्य अमित शाह यांनी या बैठकीदरम्यान केलं. जम्मू काश्मीरमध्ये हल्लीच झालेल्या एकाहून अधिक दहशतवादी हल्ल्यांना पाहता शाह यांनी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली होती . जिथं त्यांनी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना आपली भूमिका स्पष्ट केली. २९ जूनपासून सुरु होणाऱ्या अमरनाख यात्रेसाठीच्या तयारीचा आढावाही शाह यांनी या बैठकीदरम्यान घेतला.

चार दिवसांत चार दहशतवादी हल्ले
सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या एका बैठकीमघ्ये जम्मू काश्मीरमधील सुरक्षेची व्यवस्था, आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील सुरक्षा व्यवस्था, केंद्र शासित भागामध्ये असणारे दहशतवादी तळ यासंदर्भातील माहिती संबंधितांना सुपूर्द करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सलग चार दिवसांमध्ये जम्मू काश्मीर भागात चार ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. रियासी, कठुआ, डोडा इथं हे हल्ले झाले असून, यामध्ये भाविक आणि जवानांचा मृत्यू ओढावला.

दक्षिण काश्मीरमध्ये असणाऱ्या अमरनाथ गुफा मंदिराच्या यात्रेला प्रारंभ होण्याआधीच हे हल्ले झाल्यामुळं सध्या इथं तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामुळं आता इथं तैनात असणाऱ्या लष्कराची जबाबदारी आणखी वाढल्याचं नाकारता येत नाही.