तभा वृत्तसेवा
भुसावळ : शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसरच्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (19, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, खुनानंतर संशयित अमृतसरला पसार झाले आहेत.
खून करून मृतदेह फेकला
सूत्रांच्या माहितीनुसार, मनमीतसिंग आपल्या पाच मित्रांसह बुधवार, 26 रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता मात्र डी-2 डब्यात पाच तरुणांचा एका प्रवाशाशी वाद झाल्यानंतर त्यांनी संबंधितास मारहाण केली. मात्र संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले व गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमीतसिंगचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे सोबतच्या चारही मित्रांनीच हा खून केल्याचा संशय आहे. याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चारही संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डेबिट कार्डवरून पटली ओळख
मृत व्यक्तीजवळ डेबिट कार्ड होते. ते कार्ड पंजाब ऍण्ड सिंद या बँकेचे होते, त्या कार्डावरून पोलिसांनी औरंगाबाद येथे त्या बँकेत चौकशी करून त्या कार्डावरून मृतदेहाची ओळख पटविली. शुक्रवारी सायंकाळी मृतदेहाची विच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मारहाण करीत चिरला गळा
खंडवा मार्गावरील यार्डात कॉर्ड लाईनवर गुरुवारी सकाळी दहा वाजेपूर्वी मनमीतसिंग गुरुप्रीतसिंग या प्रवाशाचा मृतदेह सापडला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी रवाना केला असता विच्छेदनावेळी मृत व्यक्तीचे हात, पाय, खांदा हे फ्रॅक्चर झाल्याचे तसेच गळासुध्दा चिरल्याचे आढळून आले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र नंतर मयताच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शखाली पोलीस तपास करीत आहे.