अयोध्या : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात संगमरवर आणि सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या आठ फूट उंचीच्या सिंहासनावर रामललाची मूर्ती विराजमान होणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या सदस्याने दिली. राजस्थानातील कारागीर हे सिंहासन तयार करीत असून, ते 15 डिसेंबरपर्यंत अयोध्येत पोहोचेल, असे सदस्याने सांगितले. हे सिंहासन आठ फूट उंच, तीन फूट लांब आणि चार फूट रुंद असेल. राममंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले.
राममंदिराच्या तळमजल्याचे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असून, पहिल्या मजल्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. पहिल्या मजल्यावर जवळपास 17 खांब बसवण्यात आले असून, केवळ दोन खांब बसवणे बाकी आहे. पहिल्या मजल्याचे छतही 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. परिक‘मा मार्गावरील फ्लोअरिंगचे काम पूर्ण झाले आहे आणि गृह मंडपावर संगमरवर टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. प्रवासी सुविधा केंद्राच्या तीनही मजल्यांच्या छताचे बांधकाम करण्यात आले असून, राममंदिराच्या बाह्य भिंतीच्या प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल. रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या वस्तू देणगीस्वरूपात दिल्या. या वस्तू जमा करून ठेवणे कठीण असल्याने ते वितळवले जाईल. एका प्रतिष्ठित संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सोने वितळवण्याचे केले जाईल, असे मित्रा यांनी सांगितले.