अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह पसरवण्यचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच याला नऊ घटकांना न्याय देणारा ‘नवरत्न’ अर्थसंकल्प म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असेही म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवक आणि मोठ्या प्रमाणात पायभूत सुविधा आहेत. सर्वसामान्य माणसाला आवश्यक असलेल्या बाबींवर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. यामध्ये करदात्यांना मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे.”

“सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा आणि पायभूत सुविधा देण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलं आहे. एकंदरीत देशातील सर्वांना न्याय देणारा, देशाला पुढे घेऊन जाणारा आणि देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटचालीकडे घेऊन जाणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे,” असे ते म्हणाले.

विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना ते म्हणाले की, “हा देशाचा अर्थसंकल्प असून यातील सर्व योजना महाराष्ट्राला लागू आहेत. महाराष्ट्र हा सर्वात मोठा करदाता आहे. त्यामुळे या करदात्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच शेतकरी, युवक आणि महिलांनाही याचा फायदा होणार आहे. महायूती सरकारने गेल्या दोन वर्षात केलेली कामं आपल्या समोर आहेत. महाविकास आघाडीने बंद केलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. अनेक योजना राबवण्याकरिता केंद्र सरकारनेदेखील आपल्याला मदत केली आहे, ” असे त्यांनी सांगितले.

“विरोधक पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह पसरवण्यचा प्रयत्न करत आहेत. परंतू, देशाला पुढे नेणारं हे बजेट आहे हे त्यांना कळत नाही. जनता सुज्ञ आहे. लोकसभेप्रमाणे लोक तुमच्या फसवेगिरीमध्ये येणार नाहीत. तुम्ही टीका केल्यास सर्वसामान्य माणसं तुम्हाला तुमची जागा दाखवेल. विरोधकांनी आपली पोटदुखी थांबवावी आणि त्यांची पोटदुखी वाढल्यास बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी ठेवला आहे,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.