प्रा. डॉ. अरुणा धाडे
पुरातन मंदिरं बघायला मला फार आवडतात. कारण ही पुरातन मंदिरं भूतकाळाबद्दल वर्तमानाला काही सूचक सांगत असतात. ते ‘सांगणं’ आपण लक्षपूर्वक ऐकलं तर वैभवशाली भूतकाळाचे आकलन होईल आणि आजच्या वर्तमानातून अनिश्र्चित भविष्याकडे अग्रेसर होणे समृद्ध होईल.
द्रविड वास्तुकलेचे भव्य आणि सुंदर ‘कपालेश्र्वर मंदिर’ हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिर मानले जाते. चेन्नईच्या ‘माईलापूर’ परिसरातील हे मंदिर तामिळनाडूतील अनेक पुरातन धार्मिक स्थळांपैकी एक आहे. शिवभक्तांसाठी कपालेश्र्वर महादेव मंदिर हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरांसारखेच महत्वाचे आहे. भारतातील दक्षिण प्रांतातील पराक्रमी पल्लव राजांनी सातव्या शतकात हे मंदिर बांधले होते.
कपालेश्र्वर मंदिर द्रविडीयन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. सुंदर नक्षीकाम असलेले उंच गोपुरम मंदिराचे मनोरे वास्तुशिल्पांचे समृद्ध वैभव दर्शवितात. मंदिरांचे सौंदर्य ह्या गोपुरमवर असणार्या लक्षवेधक नक्षीकामामुळे उठून दिसतं. जवळजवळ सगळ्या देवीदेवतांना, पक्षी प्राण्यांना, प्रकृती प्रतिकांना त्यात स्थान आहे. विशेष म्हणजे ही शिल्पे पौराणिक कथानकाच्या स्वरूपात आहेत. कथानकाला अनुसरून त्यात वापरण्यात आलेले गडद निळे, लाल, केशरी, हिरवे, पिवळे, श्याम, शुभ्र असे रंग संपूर्ण मंदिराचे सौंदर्य वाढवतात. त्याच्या आजूबाजूच्या परिसराला बहुरंगी चैतन्य प्रदान करतात.
ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भानुसार कपालेश्र्वर मंदिर हे मैलापूरच्या समुद्रकिनारी वसलेले असल्याचे म्हटलेले आहे, पण आताचं मंदिर समुद्र किनार्यापासून 1/1.5 किलोमीटर आत आहे. मग ऐतिहासिकसंदर्भात उल्लेखलेले समुद्रकिनारी असलेले आणि आताचे शहरी भागात असलेले मंदिर हे दोन भिन्न मंदिर आहेत की काय? अशी शंका येते. त्याबाबतीत माहिती शोधल्यावर कळतं की, सातव्या शतकात पल्लवांनी बांधलेले मूळ मंदिर समुद्र किनारीच होते, परंतु पोर्तुगीज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी अनेक मंदिरं पाडली. कपालेश्र्वर मंदिरसुद्धा नष्ट केलं. त्यावर नंतर पोर्तुगीजांनी चर्च बांधले. सध्याचे चेन्नई शहरी असलेले प्रसिद्ध ‘सानथोम चर्च’ हे त्याच जागी उभे आहे. चर्चच्या वास्तूत प्राचीन बांधकामाचे अवशेष असल्याचे म्हटले जाते. पुढे सोळाव्या शतकात विजयनगरच्या ‘तुलुवा’ राजघराण्याने ह्या मंदिराची पुनर्बांधणी करून विस्तृतीकरण केले. तेच मंदिर आजचे कपालेश्र्वर मंदिर आहे.
मंदिराच्या ‘कपालेश्र्वर’ नावाबद्दल पुराणात एक आख्यायिका आहे. एकदा ब्रह्माकडून शिवाचा अनादर होतो. त्यामुळे रागाच्या भरात शिव ब्रह्मदेवाचे चारपैकी एक मस्तक (कपाळ) तुडवितो. आपल्या हातून झालेल्या चुकीचे प्रायश्र्चित्त म्हणून आताच्या कपालेश्र्वर स्थळी काळ्या चकाकदार पाषाणातील भव्य शिवलिंग स्थापून ब्रह्मदेव आपल्या तपश्र्चर्येने शिवाला प्रसन्न करून घेतो. हरवलेलं मस्तक आणि शक्ती पुन्हा प्राप्त करतो.
या मंदिराशी संबंधित कित्येक पौराणिक कथा स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. ‘चार वेदांनी’ भगवान शंकराचं पूजन याच भूमीवर केलं होतं. त्यामुळे या स्थानाला ‘वेदपुरी’ असेही म्हणतात. याच मंदिर परिसरात मुरुगनला पार्वतीकडून भाला (शक्तिवेल) मिळाला होता. या आजूबाजूच्या परिसराला ‘शुक्रापुरी’ नाव आहे कारण असुरांचे गुरू शुक्राचार्यांनी त्यांचा डोळा परत मिळावा म्हणून भगवान शिवाची आराधना याच ठिकाणी केली होती. रामायणाचा उल्लेख या मंदिरासंदर्भात असा येतो की, रावणाशी युद्ध जिंकण्यापूर्वी रामाने याच मंदिरात शिवाची पूजा केली होती. एव्हाना सांज होत आली होती. मावळती केशरी शांत सूर्याची चाकाकती रिंगणे श्याम सुंदर गोपुरमला तेजाळत होती.