जळगाव (चोपडा): तालुक्यातील चुंचाळे येथील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
चुंचाळे येथील ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी) वय ४२ याने २६ ऑगस्ट २०२३ ला दुपारी एकाच्या सुमारास आठ वर्षांची मुलगी तिच्या भावासोबत खेळत असताना तिला तंबाखूची पुडी आणण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. त्याचवेळी आरोपी ज्ञानेश्वर याचा मुलगा घरी आला आणि दरवाजा ठोठावू लागला. आरोपीने त्यावेळी पीडितेच्या तोंडावर हात ठेवला. मात्र मुलगा जोरात दरवाजा ठोठावू लागल्याने त्याने दरवाजा उघडला. ही संधी साधत पीडितेने तेथून पळ काढला आणि झालेला प्रकार आपल्या आजीला सांगितला.
आजीने तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील करण्यात आली होती. सहाययक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी जलद तपास करून महिन्यातच दोषारोप पत्र दाखल केले.
या संवेदनशील घटनेबाबतपोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सरकारी वकील ॲड. किशोर बागूल यांना विशेष पत्र देऊन खटला जलद चालविण्याची मागणी केली होती.ॲड. बागूल यांनी न्यायालयला पत्र देऊन विनंती केली. न्या. पी. आर. चौधरी यांनी दखल घेत खटला वेगात चालवला. अवघ्या पाच महिन्यात निकाल दिला. न्यायाधीशांनी पीडितेची साक्ष न्याय कक्षात न घेता तिची भीती काढण्यासाठी स्वतःच्या चेंबरमध्ये सरकारी वकील,आरोपीचे वकील व तिच्या आई समक्ष पोस्को कायद्यांतर्गत पीडितेची साक्ष नोंदविण्यात आली
या खटल्यात सरकारी वकील ॲड. किशोर बागूल यांनी आठ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. न्या. पी. आर. चौधरी यांनी फिर्यादी, पीडिता, वैद्यकीय अधिकारी व तपासाधिकारी संतोष चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी ज्ञानेश्वर यास बालकांच्या लैंगिक शोषण कायदा २०१२ च्या कलम ४ नुसार २० वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा देण्यात आली .