अल्पवयीन वधूशी लग्न करून मुलीस दिला जन्म, पतीसह पिडितेच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल

जळगाव :  अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती असतानाही तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. पतीने तिच्याशी शरीर संबंध केले. त्यानंतर गर्भवती ठेवून मुलगी जन्माला घातली. याप्रकरणी पतीसह सासू सासरे तसेच पिडितेचे आई वडील यांच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवार 27 रोजी दाखल झाला.

पिडित मुलगी 17 वर्षीय असून ती मुळ पुणे जिल्ह्यातील आहे. 7 ऑगस्ट 2022 मध्ये या अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आई वडिलांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणाशी निश्चित केला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही सासरच्या लोकांनी या विवाहाला सहमती दिली. त्यानंतर हा विवाह जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बैठक हॉलमध्ये लावून दिला.

विवाह झाल्यानंतर अल्पवयीन व तिचे पती यांच्यात वेळोवेळी संबंध झाले. पतीने अल्पवयीन विवाहितेला गर्भवती ठेवून मुलगी जन्माला घातली. याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिचे पती, सासू -सासरे तसेच पिडितेचे आई वडील यांच्या विरुध्द बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण  अधिनियम तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. सपोनि दयानंद सरवदे हे तपास करीत आहेत.