मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे. अशातच आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
त्यानुसार आज राज्यातील काही भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमधील 4 ते 8 आणि 16 ते 19 मार्चदरम्यान राज्यात अवकाळीचे नैसर्गिक संकट ओढवले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 177 कोटींच्या मदतीचीही घोषणा केली आहे. एप्रिल सुरू झाला तरी अवकाळी संकट अजून शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाही.