अवकाळीचा फटका; गहू-मका पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्ह्यातील तोंडापुरसह परिसरात बुधवार १० रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे गहू आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले. उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हात हिरावला गेल्याने शेतकरी चिंतेत आहे.

तोंडापूर आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी रात्री पासून जोरदार वाऱ्यासह पावसाळी वातावरण आहे. अशातच काल सकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले. मोठ्या मेहनतीने वन्यप्राण्यांपासून वाचवलेले गहू, मका, पीक वाऱ्यामुळे व पावसामुळे आडवे झाले असल्याचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तोंडापूर शिवारात राम भाऊ अपार यांच्या शेतातील एक एकर मका पीक पावसामुळे व जोरदार हवेने आडवे झाले.

खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहु, हरभरा, मका, ज्वारी पिकाची लागवड केली मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने पुन्हा शेतकरी वर्गाच्या नशिबी नुकसानच आले.