अवकाळीने जळगावकरांना झोडपले, बत्ती गुल

जळगाव : विजांचा कडकडाट…मेघगर्जनेसह वाहणारा सोसाट्याचा वारा…अन् धो-धो पडणारा पाऊस… यामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांसह नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. जळगाव शहरात आज गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजेपासून विजांच्या कडकडात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह शहरात वादळी पावसाच्या दमदार हजेरीमुळे अनेक भागात बत्ती गुल झाली आहे. तसेच अनेक भागात झाडे उन्मळली असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील विदर्भासह खान्देशात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा संपूर्ण विदर्भातील 11 आणि खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि जळगांव अशा तीन जिल्ह्यासहित एकूण 14 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 1 डिसेंबरपर्यंत कायम आहे. तर मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात मात्र शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे.