अवकाळी पावसाने घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

जळगाव : . जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. यात घरांवरील पत्रे उडून गेली आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे प्रकार उघड झाले आहेत. यात यावल तालुक्यात या वादळ वाऱ्यामुळे घर कोसळवून एकाच कुटुंबातील चौघांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

रविवारी रात्री वादळी वाऱ्यात यावल तालुक्यात आंबा पाणी गावाजवळील थोर परिसरात एक घर कोसळले. यात घरात झोपलेल्या कुटुंबीयांपैकी चौघे ठार झालेत. या मृतांमध्ये पती-पत्नी, लहान मुलगी व एका वृद्ध महिलेचा समावेश असून सुदैवाने या अपघातातून ४ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे.  या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब संपले आहे. याबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याघटनेबाबत पोलिसांना कळविलेले. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतले.  घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबीय रविवारी रात्रीचे जेवण करून घरात झोपले होते. त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अचानक घर कोसळलं. या घटनेत घरातील चौघेजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.  या घटनेत ४ वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचले. मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे