मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा चर्चा केली आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
गेली ६ दशके ज्या चव्हाण घराण्याने काँग्रेसी विचार जोपासला आणि त्याच्या बदल्यात काँग्रेसने आधी शंकरराव चव्हाण आणि नंतर अशोक चव्हाण यांना राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर (मुख्यमंत्री) बसण्याचा मान दिला, त्याच काँग्रेस पक्षाची साथ सोडून आता अशोकराव चव्हाण भाजपवासी होण्याच्या मार्गावर आहेत. कालपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा करणारे अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतायेत, याचं शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील आश्चर्य वाटलेलं आहे. त्याच आशयाची पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे. परंतु ही पोस्ट करताना त्यांनी जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत झालं, तेच काँग्रेससोबत होईल का? अशी भोळी शंका उपस्थित केली आहे. त्यावर आपल्या देशात काहीही घडू शकते, अशी मिश्किल कोटीही केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले ?
अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते.. आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते, असं संजय राऊत यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १५ तारखेच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी त्यांचा भाजपप्रवेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.