मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई रोखण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्या लढाईला मोठं यश मिळाले असून, त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीयदृष्ट्या पाहिल्यास याचा फायदा कोणत्या पक्षाला आणि नेत्याला होणार आहे याची देखील चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांना देखील याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना होणार असा फायदा…
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मराठा आरक्षणविरोधी असल्याचे चित्र विरोधकांनी तयार केले होते. अशात आंतरवाली सराटीत सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात मराठा आरक्षणविरोधी असलेल्या चर्चेला अधिक वेग आला. याचवेळी फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावला जाणार नसल्याचे सांगत भाजपचे कट्टर मतदार असलेल्या ओबीसींना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्यांनी भाजप ओबीसीसाठी झटणारा पक्ष असून, आमच्या डीएनमध्ये ओबीसी असल्याचे वक्तव्य करत आपण ओबीसींच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला. याच काळात मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यातील वादाचा नवीन चापटर समोर आला. हा पण एक रणनीतीचा भाग मानला जात आहे. त्यामुळे फडणवीस यांनी ओबीसींची बाजू धरत आपला ओबीसी मतदार कायम आपल्यासोबतच ठेवला. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे पाठोपाठ फडणवीस आणि त्यांच्या भाजपला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा होणार आहे.
मुख्यामंत्री शिंदेंना सर्वाधिक फायदा..
एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री असून, त्यांच्याकडून मराठा समाजाला न्याय मिळणार का? अशी चर्चा होती. दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाची धार वाढत गेल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका होऊ लागली. शेवटी शिंदे यांनी थेट छत्रपती शवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देणारच असे म्हटले होते. तर, जरांगे मुंबईत येताच शिंदे यांच्या ओएसडी मंगेश चिवटे यांनी सतत बैठका घेतल्या. शेवटी अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला आणि स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडले. त्यामुळे याचा सर्वाधिक फायदा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या शिंदेसेनेला होणार असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांना हि असा हॊईल फायदा..
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचे पहिल्या दिवसापासून सांगण्यात आले. आंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाल्यावर सर्वात आधी गावात शरद पवार पोहचले होते. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेसोबत शरद पवारांचे फोटो व्हायरल झाले. भाजप आमदार नितेश राणे यांनी हे फोटो शेअर करत यामागे शरद पवार गटाचा सहभाग असल्याचे सांगितले. त्यातच दोन दिवसांपूर्वी आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी परवानगी देण्याची मागणी करत आमदार रोहित पवारांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी भेट घेतली. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्या आंदोलनात शरद पवारांचा मोठा सहभाग असल्याच्या चर्चेमुळे त्यांना देखील याचा राजकीय फायदा मिळण्याची शक्यता आहे.