आचारसंहिता शिथील करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूक आयोगासह शासनाकडे विनंती

जळगाव : सद्यः स्थितीत जिल्ह्यासह राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता ४ जून रोजी मतमोजणी होईपर्यंत लागू राहणार आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक मतदान पार पडले असून जिल्ह्यातील प्रशासकीय नोकरभरती तसेच कर्मचारी बदल्यांसंदर्भात आचारसंहिता शिथित करण्यात यावी, अशी विनंती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्य शासनासह निवडणूक आयोगाकडे केली आहे.

जिल्ह्यात सुमारे ६६ ते ८० जागांसाठी तलाठी कर्मचारी परीक्षा लोकसभा निवडणूक कार्यक्रम लागू होण्यापूर्वीच घेण्यात आली आहे. परंतु, १६ मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी आचारसंहिता लागू झाली असल्याने तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आलेल्या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत.

तसेच महसूल व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या सर्वसाधारणपणे मे महिन्यात मान्सूनपूर्व केल्या जातात. आचारसंहिता असल्याने त्यादेखील रखडल्या आहेत. तलाठी नियुक्त्या तसेच कर्मचारी बदल्यांसाठी आचारसंहिता शिथील करण्यात यावी, अशी विनंती राज्यशासनासह निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.