शहरातून हैदराबाद व गोव्याला सुरू झालेल्या विमानसेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जळगावहून पुण्यासाठीही विमानाने नियमित ‘उड्डाण’ सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात पुण्यासाठी प्रायोगिक फेरी झाल्यानंतर मंगळवार (ता. २८)पासून नियमित विमानसेवा सुरू झाली असून, पुण्याच्या विमानाची पहिलीच फेरी ‘हाऊसफुल्ल’ गेल्याचे सांगण्यात आले.
प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा जिल्हा म्हणून जळगावचे विमानतळ प्राधान्यक्रमाने विकसित करण्यात आले. मात्र, श्रीमती पाटील यांच्या कार्यकाळानंतर विमानतळ केवळ ‘शो पीस’ बनले होते. नंतर मोदी सरकारच्या कार्यकाळात पाच-सहा वर्षांपूर्वी जळगाव विमानतळावरून ‘उडान’ योजनेंतर्गत मुंबई-अहमदाबाद-जळगाव अशी विमानसेवा सुरू झाली. सुरवातीला ‘ट्रू-जेट’ या कंपनीने सुरू केलेली विमानसेवा काही महिन्यांतच बंद पडली. त्यानंतर २०२० मध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर ही सेवा कधीही सुरू होऊ शकली नाही.
विमानसेवेसाठी पाठपुरावा
यादरम्यान जळगाव विमानतळ केवळ व्हीव्हीआयपींच्या आवागमनासाठी तेवढे मर्यादित राहिले. मंत्र्यांच्या दौऱ्याव्यतिरिक्त या तळावर विमानच उतरत नव्हते. दरम्यानच्या काळात माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. विमानतळावर धावपट्टीचे अंतर वाढविणे, नाईट लॅन्डींगची सुविधाही करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. या सुविधा सुरूही झाल्या. सोबतच वैमानिक प्रशिक्षण केंद्रासाठीही विमानतळाचा वापर सुरू झाला.
पुण्याला ‘टेक ऑफ’साठी मेअखेर उजाडणार; गोवा- हैद्राबादच्या धर्तीवर सेवा
गोवा, हैदराबाद सेवा
सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश आले आणि अखेरीस दोन महिन्यांपूर्वी विमानतळावरून पुन्हा विमान उडू लागले. या वेळी ‘फ्लाय-९१’ या कंपनीने हैदराबाद व गोवा या दोन ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू केली. साधारणत: २२०० रुपये त्यासाठी प्रवासदर निश्चित केले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या प्रवासी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरू आहे. ७२ सीटर क्षमता असलेल्या विमानातून गोवा, हैदराबादसाठी जवळपास ४०-५० प्रवासी प्रवास करतात.
आता पुणे सेवाही सुरू
हैदराबाद, गोव्यापेक्षाही जळगाव येथून पुणे, मुंबईसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी होती. त्यापैकी पुण्याला विमानसेवा मंगळवारपासून सुरू झाली. त्यासाठी फ्लाय-९१ कंपनीने गेल्या शुक्रवारी (ता. २४) प्रायोगिक फेरी नेली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच फेरीला विमान फुल्ल होते. मंगळवारपासून नियमित सेवा सुरू झाली असून, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व रविवार असे चार दिवस पुण्याला विमानसेवा असेल. मंगळवारी पहिली फेरी पूर्ण क्षमतेने ७२ प्रवासी घेऊन गेली. त्यामुळे पुण्याकडील ‘उड्डाण’ हाऊसफुल्ल असेल, असे दिसते.
पुणे विमानसेवेचे वेळापत्रक असे
*आठवड्यातून चार दिवस : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार
*जळगाव-पुणे : दुपारी दोनला निघून पुण्यात सव्वातीनला पोहोचेल
*पुणे-जळगाव : सायंकाळी पाचला निघून सव्वासहाला जळगावला पाहोचेल