आजही राज्यात मुसळधार पाऊस; हवामान विभागाची माहिती

तरुण भारत लाईव्ह । ३० सप्टेंबर २०२३। मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. या दरम्यान आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला. आज म्हणजेच शनिवारी राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कुठेही अलर्ट दिला नाही. तर राज्यातील उर्वरित भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे.  दोन दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असून यामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची  शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.  तर गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागाने आँरेज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांच्या अनेक बोटी बंदरातच असल्याने त्यांच्यापुढे संकट निर्माण झाले आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळाची परिस्थिती वाढणार आहे. बदललेल्या परिस्थितीमुळे सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने सरासरी गाठली आहे.