आज अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा इशारा

तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस झाला. यातच आज काही जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अनेक भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षीही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला. सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सूनने राजस्थानातून काढता पाय घेतला आहे. गतवर्षी २० सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते. राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सोमवारी कमी झाला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील काही धरणांत थोडी वाढ झाली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. राज्यात सध्या पावसाने काहीशी उघडीप दिली असली, तरी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. परतीचा प्रवास सुरू झाल्याने मॉन्सूनचा आस निवळून गेला आहे. आग्नेय उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.