नवी दिल्ली: देशातील सर्वांत मोठी कार निर्माता कंपनी आता जमिनीसोबतच हवेत उडण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकी आपली पालक कंपनी सुझुकीच्या मदतीने एक इलेक्ट्रिक एअर कॉप्टर बनविण्याची तयारी करीत आहे.याला स्कायड्राईव्ह असे नाव देण्यात येणार आहे. सुरुवातीला ही फ्लाईंग कार जपान आणि अमेरिकेसारख्या बाजारात उतरविली जाणार आहे. नंतर ती भारतीय बाजारात आणली जाईल. हे एअर कॉप्टर्स ड्रोनपेक्षा मोठे असतील. मात्र, सामान्य हेलिकॉप्टरपेक्षा लहान असतील. यात वैमानिकासह किमान तीन जण बसण्याची व्यवस्था असेल.कंपनी हे एअर कॉप्टर प्रथम जपान आणि अमेरिकेच्या बाजारात एयर टॅक्सीच्या स्वरूपात सादर करणार आहे. नंतर तेथील प्रतिसाद पाहून भारतीय बाजारात आणण्याचा विचार केला जाईल. बाजारपेठेसोबतच कंपनी याचे उत्पादन मूल्य कसे कमी करता येईल, यावर विचार करीत आहे.
केव्हा होणार सादर?सुझुकी मोटर्सचे सहायक प्रबंधक केंटो ओगुरा यांनी सांगितले की, ही योजना वास्तवात आणण्यासाठी सध्या विमान प्राधिकरणासोबत चर्चा सुरू आहे. स्कायड्राईव्ह नावाच्या या इलेक्ट्रिक एअर कॉप्टरला जपानमध्ये २०२५ मध्ये ओसाका एक्स्पोमध्ये लाँच केले जाईल,अशी आशा आहे. यात ‘मेक इन इंडिया’ तंत्रज्ञान वापरण्यावर मारुतीचा भर असणार आहे.कंपनी सध्या आपल्या संभाव्य ग्राहक आणि भागीदारांच्या शोधात भारतीय बाजारात संशोधन करीत आहे.
भारतात एअर कॉप्टर्स यशस्वी होण्यासाठी त्याच्या किमती आटोक्यात असणे गरजेचे आहे. उड्डाण करताना १.४ टन वजनी एअर कॉप्टरचे वजन पारंपरिक हेलिकॉप्टरच्या वजनाच्या तुलनेत जवळपास अर्धे असणार आहे.वजनाने हलके असल्याने याच्यासाठी इमारतींच्या गच्चीचाही वापर केला जाऊ शकणार आहे. इलेक्ट्रिफिकेशनमुळे याचे उत्पादन मूल्य तसेही कमीच आहे. पुढील संशोधनानंतर याचे सुधारित स्वरूप समोर आले की, त्याची उपयोगिता अधिक लक्षणीय ठरणार आहे.