चोपडा : आदिवासी कोळी जमातीबाबत शासन, प्रशासन संवेदनशील नसल्याचा आरोप करत लवकरच रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा आदिवासी कोळी जमात मंडळाचे चोपडा तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी दिला.
राज्यभरातील आदिवासी कोळी लोकांना कोळी नोंदीनुसार सुलभपणे टोकरेकोळी, महादेवकोळी, मल्हारकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, यासाठी वर्षानुवर्षांपासून लढा सुरू आहे. संबंधित विभागाकडे जातप्रमाणपत्रांचे प्रस्ताव प्रदीर्घ काळ प्रलंबित असणे कायद्याला धरून नाही.
घटनेने दिलेल्या अधिकाराचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र हे साधन आहे. त्यासाठी कोळी लोकांना सातत्याने आंदोलन, उपोषण, मोर्चा, रास्तारोको करावे लागतात. याबाबत शासन प्रशासन संवेदनशील नाही. आम्हाला कोळी नोंदीनुसार जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे ही मागणी रास्त व संविधानिक असून संबंधित विभाग कोळी जमातीला न्याय व हक्कांपासून वंचित ठेवत आहे.
यामुळे कोळी लोकांचे शैक्षणिक सामाजिक नोकरी विषयक नुकसान होत असून त्यांचा सहनशीलतेचा अंत होत आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रांत कार्यालयांकडे प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या प्रकरणांना तत्काळ अनुसूचित जमातीचे दाखले देण्यात यावेत, म्हणून आम्ही जळगाव शहरातील सर्वच म. वाल्मिकी युवक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह जिल्हाभरातील कोळी जमातीचे सर्वपक्षीय, राजकीय, सामाजिक संस्था संघटनांचे जेष्ठश्रेष्ठ नेतेमंडळी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, अभ्यासक, समाजसेवक, समितीप्रमुख, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, महिलामंडळे, तरूणमंडळी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी व शेकडों जमातबांधवांतर्फे नियोजनबध्द पध्दतीने शांतता कायदा व सुव्यवस्था राखून जळगाव येथे लवकरच तीव्र रेल्वे रोको आंदोलन करणार आहोत, असा इशारा आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांनी पत्रकान्वये दिला आहे.