“आधी अभ्सास करावा आणि मग बोलावं”, गिरीश महाजन कडाडले

नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे व यामध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहे,अश्यातच नागपूर हिवाळी अधिवेशनातून एक बातमी समोर आली आहे.यशोमतीताई आपण मंत्री असताना आपण काय केलं? असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी केला काँग्रेस आमदार यशोमती ठाकुर यांना केला आहे. बुधवारी सभागृहात अंगणवाडी सेविकांच्या वेतवाढीबद्दल बोलत असताना गिरीष महाजन आणि यशोमती ठाकुर यांच्यात खडाजंगी झाली.

गिरीष महाजन म्हणाले की, “ग्रामपंचायत कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने आंदोलनाला बसल्या आहेत. परंतू, तीन-चार महिन्यांपुर्वीच त्यांच्या मागणीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ केली आहे. त्यानंतर आता परत वेतन वाढवून द्या अशी त्यांची मागणी आहे. सगळेच आता पगारवाढीची मागणी करत आहेत. परंतू, शासनावर किती बोजा टाकावा हा प्रश्न आहे. तरीसुद्धा अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर निश्चितच गांभीर्याने विचार केला जात आहे.”

यावर यशोमती ठाकूर संतापल्या आणि २५ टक्के वाढ झाली नसून ती तुटपुंजी वाढ आहे, असे म्हणाल्या. तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा शासनाचा गाभा आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना भरघोस मदत मिळाली पाहिजे, अशी माझी सरकारकडे विनंती आहे, असे त्या म्हणाल्या.

त्यानंतर गिरीष महाजन म्हणाले की, “यशोमती ताई आपण या खात्याचे मंत्री असताना काय केलं? आपण त्यावेळी काहीच केलं नाही आणि आता म्हणत आहात भरघोस मदत द्या. इतके दिवस तुम्ही काय केलं. तुम्ही एक रुपयाही वाढवला नाही. अडीच वर्षे सत्तेत असताना यांनी काहीही केलं नाही. आम्ही अंगणवाडी सेवकांना ८ हजारांहून १० हजार रुपये पगारवाढ दिली. मदतनिसांनादेखील ६ हजारांहून ८ हजार रुपये पगारवाढ केली.”

“यशोमतीताई मंत्री राहिलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की, माझा या विषयाशी काहीही संबंध नाही. हा प्रश्न कोणत्या खात्याचा आहे हे त्यांना कळायला हवं. त्या कोणताही प्रश्न विचारत आहेत. आपण काहीच करायचं नाही आणि आता म्हणायचं १०० टक्के वाढ करा. आपण या सदनाच्या जेष्ठ सदस्या आहात. त्यामुळे आधी अभ्सास करावा आणि मग बोलावं,” असा टोलाही गिरीष महाजनांनी लगावला आहे.