मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका ३७ वर्षीय विवाहितेने स्वतः विष तर प्यायलेच पण तिच्या दोन निष्पाप मुलांनाही विष दिले. विष पिऊन महिलेचा मृत्यू झाला. दोन मुलांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेकडून सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी एसपी जयंत राठोड यांनी सांगितले की, ग्रेटर रतन एव्हेन्यू, एमआर 5 रोड, उज्जैन येथे राहणाऱ्या सीमाने रविवारी रात्री विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी सीमाने तिचा 14 वर्षांचा मुलगा अक्षत आणि 7 वर्षाची मुलगी माही यांनाही विष प्राशन केले होते. रात्री सीमा यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. मुलगा अक्षतने फोन करून या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना दिली होती.
पोलीस अधिकारी राठोड पुढे म्हणाले की, या प्रकरणाची माहिती मिळताच चिमणगंज पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांच्या मदतीने सीमा आणि तिची दोन मुले अक्षत आणि माही यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे सीमा यांचा मृत्यू झाला, तर दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
एसपी जयंत राठोड यांनी सांगितले की, महिलेने विषारी द्रव्य प्राशन केल्याची आणि मुलांनाही विषारी द्रव्य पाजल्याची माहिती नीमच येथे राहणारे तिचे पती कमल त्रिवेदी यांना दिली होती. माहिती मिळताच महिलेचा पती कमल तात्काळ उज्जैनला आला. तपासादरम्यान पोलिसांना सुसाईड नोट सापडली. यामध्ये महिलेने स्वत:च्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. तसेच, सासर आणि आई-वडिलांकडून छळ होऊ नये, असे महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.