उदयपूर: राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने कर्जबाजारी झाल्याने मित्राचे घर लुटण्याचा कट रचला.आधी त्याने मित्राला त्याच्या घराची प्रत्येक छोटी-मोठी माहिती विचारली. मित्राचे कुटुंबीय बाहेर गेले असता संधीचा फायदा घेत तो घरात घुसला. त्याने आपल्याच मित्राच्या आजीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आजीची मुलगी घटनास्थळी येताच आरोपी विद्यार्थ्याने तेथून पळ काढला. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्याने गुन्हा करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलवर गळा दाबल्याची माहिती शोधून काढल्याचे समोर आले. उदयपूरच्या भूपालपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुखदेव नगर येथून पोलिसांनी १९ वर्षीय वर्णिक सिंग याला अटक केली आहे. चौकशीत आरोपी वर्णिक हा नातू आयुषचा मित्र असल्याचे समोर आले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी वर्णिक सिंग हा उदयपूरमधील एका कॉलेजमधून इंजिनीअरिंग करत असून त्याला ऑनलाइन बेटिंग खेळण्याची खूप आवड आहे. बेटिंगमध्ये पैसे गमावल्यानंतर त्याच्यावर बरेच कर्ज झाले आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने दरोड्याची योजना आखली पण ती अयशस्वी झाली. आरोपीचे वडील सैन्यात काम करतात असे सांगितले जात आहे.
डेप्युटी शिप्रा राजा यांनी सांगितले की, आरोपी आणि त्याचा मित्र आयुष दोघेही चौथीपासून एकमेकांना ओळखतात. आरोपीने बारावीनंतर इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनीअरिंग करत असताना त्याने आपल्या मित्राकडून त्याच्या घराची सर्व माहिती गोळा केली आणि आयुषचे वडील हॉटेल ऑपरेटर तसेच रिअल इस्टेटचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले. या सर्व माहितीवरून आरोपी वर्णिकने आपल्या मित्राच्या घरी रोख रक्कम असेल असे त्याला वाटले. घटनेपूर्वी आरोपीने त्याच्या मित्राशी बोलून घराची बरीच माहिती गोळा केली आणि त्याला समजले की त्याचे मित्र व कुटुंबीय नाशिकला जात असून त्याची आजी मीरा देवी घरी एकटीच असणार आहे.
पोलीस अधिकारी भरत योगी यांनी सांगितले की, 27 जानेवारी रोजी आरोपी मित्र आयुषच्या घरी गेला आणि तोंडावर मास्क आणि डोक्यावर हेल्मेट घातलेला होता.आरोपी मित्राच्या घरी पोहोचला आणि वृद्ध आजीवर हल्ला केला आणि तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला.आजीने आरडाओरडा केल्यावर तिची मुलगी सीमा धावत जवळच्या खोलीत आली.तेव्हा आरोपी मित्राने तिला धमकावून तेथून पळ काढला. हा प्रकार आजीचा नातू आणि आरोपीचा मित्र आयुष याला कळताच त्याने आरोपी मित्राला फोन करून घरी जाऊन आजीची काळजी घेण्यास सांगितले.