आनंदाची बातमी! गृह, वाहन कर्जावरील व्याज दर ‘जैसे थे’

मुंबई:  भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी आपला द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना रेपो दरात कुठलाही बदल केलेला नाही. यामुळे गृह, वाहन यासारख्या प्रमुख कर्जावरील व्याजदर कायम राहणार आहेत. रेपो दरात कुठलाही बदल न करण्याची रिझर्व्ह बँकेची ही सलग सातवी वेळ आहे.रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याने तो ६.५ टक्क्यांवर कायम आहे. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती.

चालू आर्थिक वर्षाचे धोरण ठरविण्यासाठी आरबीआयच्या सहा सदस्यीय पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय  बैठक ३ एप्रिल रोजी सुरू झाली होती. आज बैठक संपल्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रपरिषद घेऊन पतधोरण आढावा जाहीर केला.या आढावा अहवालात रिझर्व्ह बँकेने देशाच्या आर्थिक । विकासाचा दर आणि महागाईचा दर चालू आर्थिक वर्षाच्या काळात अनुक्रमे ७ टक्के आणि ४.५ टक्के असा राहणार असल्याचे भाकीत केले आहे.

यावर्षीचा पावसाळा सामान्यापेक्षा चांगला राहणार असल्याने महागाईचा दबाव फार राहणार नाही.  त्याचा फायदा आर्थिक विकासाला होईल आणि विकास दर ७ १ टक्क्यांच्या घरात राहील, अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. त्याचप्रमाणे चांगल्या पावसाळ्याचा अनुकूल परिणाम महागाईचा दर कमी होण्यात राहणार आहे. चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर ४.५ टक्क्यांच्या आसपास असेल, असे दास यांनी सांगितले.