आनंदाची बातमी: ठाण्यात होणार धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय

ठाणे :  आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजसेवा, शिक्षण आणि वैद्यक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जीतो एज्युकेशनल मेडिकल ट्रस्टने ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा रविवारी, ३० जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असुन यासाठीची जय्यत तयारी केली आहे.

अशी माहिती ‘जितो’चे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विकासक अजय आशर यांनी दिली.या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असुन या भागातील रस्ते व इतर कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. अशी माहिती ठाणे महापालिका सुत्रांनी दिली.

देशात वेगाने वाढत असलेला कर्करोग, त्याच्या उपचारासाठी होणारा खर्च, उपचारांची मर्यादित उपलब्धता, रुग्णांची गैरसोय, मानसिक आणि आर्थिक समस्या, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवास व्यवस्थेतील अडचणी यांची स्थिती लक्षात आल्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठाणे शहरात अद्ययावत असे कर्करोग रुग्णालय उभारण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस होता. ते शिवधनुष्य जीतो ट्रस्टने उचलण्याचा निश्चय करून ठाण्यातील बाळकुम येथील ग्लोबल कोविड रुग्णालयानजीकच्या भुखंडावर धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येत आहे.

या कर्करुग्णालय आणि त्रिमंदिर संकुल यांचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते रविवारी दुपारी ४ वाजता होणार आहे. या सोहळ्यास दादा भगवान फाऊंडेशनचे मा.पूज्य दिपकभाई देसाई शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत.

तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री ना. रवींद्र चव्हाण,माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे हे उपस्थित राहणार आहेत.ठाणे महापालिकेने ३० वर्षांच्या कराराने जीतो ट्रस्टला बाळकुम येथील जमीन उपलब्ध करून दिली आहे.

टाटा मेमोरियल रुग्णालय प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी तांत्रिक सहकार्य करीत आहे. रुग्णालयाच्या बांधकामा सोबत, उपचार साधनांचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा खर्च जीतो एज्युकेशनल मेडिकल ट्रस्ट करणार आहे. जीतो ट्रस्टने महापालिकेच्या सहयोगाने २०२० पासून १०० खाटांच अत्याधुनिक महावीर जैन रुग्णालय सुरु केले असून यापूर्वी कोविडचा सामना करण्यासाठी १२०० खाटांचे अत्याधुनिक ग्लोबल रुग्णालय महापालिकेस उभारून दिले होते.

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयात ५०० हून अधिक रुग्ण खाटा, बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी), आंतर रुग्ण सेवा, रेडिएशन, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, एक्स रे, सिटी स्कॅन, एमआरआय, डे केअर सुविधा, पॅथॉलॉजी आदी सुविधा असतील. तसेच, उपचाराच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली ६०० खाटांची धर्मशाळा उभारली जाणार आहे. ती अल्पदरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध राहील. तसेच, मुंबईतील टाटा रुग्णालयाप्रमाणे या कर्करोग रुग्णालयामध्ये किफायतशीर दरात रुग्णसेवा दिली जाणार आहे.