आनंदाची बातमी : वाघूर भरले; पाण्याचे नो टेंशन

जळगाव : ऑक्टोबर महिना आला की जळगावकरांसह महापालिकेला चिंता पडते ती पुढील वर्षाच्या पाण्याची. 10 दिवसांपर्यंत वाघूर धरणाचा पाणी साठा कमी होता. त्यामुळे डिसेंबरपासून पाणी कपात करण्याचा विचार महापालिका करत होती. परंतु या 10 दिवसात अजिंठा लेणी परिसरात झालेल्या दमदार पावसाने वाघूर धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली. ते आता 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी जळगावकरांना पाणीटंचाईची चिंता जाणवणार नाही.

गेल्या 10 दिवसात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.  शनिवार, 30 सप्टेंबर रोजी दोन गेट हे 0.10 मीटरने उघडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा सावधनतेचा इशारा जळगाव पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे.

यावर्षी  जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांच्या अखेरीस दमदार पाऊस झाला. परिणामी धरणाच्या लाभ क्षेत्रात वाढ होऊन वाघूर धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातील पाण्याची पातळी 234.10 मीटर एवढी असून यापर्यंत पाणी पोचले आहे. मागील महिन्यात पाणी पातळी 233 भरली होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाण्याची आवक बंद झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. वाघूर खालोखाल हतनूर धरण हे 89.88 टक्के भरले आहे. त्याचे चार गेट 1 मीटरने उघडण्यात आले आहेत. हतनूरची पाणी पाणीपातळी 214 मीटर असून ते 213.69 मीटर भरले आहे. तर गिरणा धरण मागील वर्षी आजच्या दिवशी शंभर टक्के भरले होते. मात्र, यावर्षी आज ते केवळ 56.71 टक्के भरले आहे. तीन प्रमुख धरणे ही एकूण 75.42 टक्के भरली आहेत.

मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ 

13 मध्यम प्रकल्पातील अभोरा, मंगरूळ, सुकी, तोंडापूर हे चार प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उर्वरीत मध्यम प्रकल्पांमध्ये मोर 98.23, अंजनी 96.89, बहुळा 85.03, गुळ 81.33, हिवरा 60.60, अग्नावती 58.60, बोरी 53.20, भोकरबारी 29.33 तर मन्याड हे 1.14 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील सर्व 13 मध्यम प्रकल्प एकूण 66.42 टक्के भरले आहेत. जिल्ह्यात 96 लघू मध्यम प्रकल्प हे 50.41 टक्के भरले आहेत. अशा प्रकारे मोठे, मध्यम व लघू प्रकल्प मिळून जिल्ह्यातील धरणातील जलसाठा हा 70.69 टक्के झाला आहे.