आनंद आश्रमात पैश्याची उधळण करणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर अखेर कारवाई ; काय आहे प्रकरण ?

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील आनंद आश्रमातील एक धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमात नोटा उधळल्याचं समोर आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी-गणपतीची विसर्जन मिरवणूक गुरुवारी आनंद आश्रमात दाखल झाली असता या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात नाचणाऱ्या लहान मुलांवर आनंद दिघे यांच्या फोटोसमोर शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण केली.

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हीडिओ ट्विट केला. यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. यात टेंभीनाका शाखेचे प्रमुख निखिल बुडजूडे, शाखाप्रमुख नीतेश पाटोळे यांच्यासह काही पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याने शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यावर टीका केली जात आहे. असं असतानाच आता आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारानंतर शिंदे गटावर चौफेर टीका होत असून पक्षाची प्रतिमाही मलिन झाल्याने शाखाप्रमुख निखिल बुडजुडे, शाखाप्रमुख नीतेश पाटोळे यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच दोन दिवसांत याबाबतचा खुलासा सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे.

काय आहे पत्रात?
प्रति,

नितीन पाटोळे

12 सप्टेंबर 2024 रोजी गणपती विसर्जनाच्या रात्री आपल्याकडून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये जे कृत्य घडलं. ते अतिशय निंदनीय असून त्यामुळे आपल्या पक्षावर चौफेर बाजूने टीका होत आहे. सदर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या कारणास्तव आपल्याला पदावरून काढून टाकण्यात येत आहे. तरी सदर घडलेल्या प्रकाराबद्दल दोन दिवसात खुलासा करावा.

आपला स्नेहांकीत नरेश गणपत म्हस्के