आपले सरकारची संगणक ऑपरेटर भरती संशयाच्या भोवर्‍यात

जळगाव : जिल्हा पीरषदेच्या आपले सरकार अंतर्गत जिल्ह्यातील कंत्राटी संगणक ऑपरेटर पदासाठी मागील आठवड्यात भरती प्रक्रियेसाठी सीएससी कंपनीमार्फत परिक्षा घेण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना त्यांची नियुक्तीचे झाल्याचे तोंडी सांगण्यात आले. परंतु त्यानंतर दोन दिवसांनी जि.प.तील आपले सरकारचे जिल्हा समन्वयक यांनी नियुक्ती झालेल्या उमेदवारांना संपर्क साधून आपल्या परिक्षा पेपवर हरकत घेतल्याचे कारण सांगत त्या उमेदवारांना आपला एक गुण कमी असल्याचे कारण देत आपली नियुक्ती रद्द केल्याचे दुरध्वनीव्दारे कळविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे या भरती प्रकियेतील घोळ आता समोर येऊ लागला आहे. यातील काही उमेदवारांनी नाव न छापण्याच्या अटीवर तरूण भारतकडे याबाबत कैफियत मांडली. त्यामुळे संगणक ऑपरेटर भरती संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. नियुक्ती झालेल्या उमेदवारांना डावलून दुसर्‍याच उमेदवारांना संधी देऊन यात आर्थिक गणित साधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

परिक्षेनंतर लेखी नियुक्ती न देता त्यावेळी या उमेदवारांना तोंडी सांगण्यात आले. त्यासाठी आर्थिक गणित साधण्यासाठी त्याचवेळी लेखी स्वरुपात नियुक्ती न देता तोंडी नियुक्तीचे सांगण्यात आल्याचा उमेदवारांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे भरती प्रकियेत आर्थिक व्यवहारासाठी गैरव्यवहार झाल्याचे आता लपून राहिलेले नाही.

चौकशीची मागणी

आपले सरकारच्या कंत्राटी संगणक ऑपरेटर भरती प्रक्रियेतील घोळ लक्षात घेता जि.प.सीईओंनी याबाबत चौकशी समिती नियुक्त करून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे. संगणक ऑपरेटर भरती प्रकियेत नियुक्तीनंतर पुन्हा फेरबदल झालाच कसा असा सवाल उपस्थित होत आहे. त्यासाठी ही झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी होत आहे.

नियुक्ती तोंडी सांगितल्याने हेराफेरीची मिळाली संधी…

सीएससी या एजन्सीने परिक्षा घेतल्यानंतर निकाल दिल्यानंतर लागलीच त्यांना नियुक्ती पत्र का दिले नाही. त्यात फेरबदल करून गैरव्यवहारासाठी हा वेळ घेण्यात आला काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे परिक्षा घेणार्‍या कंपनीकडे बोट दाखवले जात आहे. परिक्षा घेणारी एजन्सी आणि आपले सरकारचा जिल्हा समन्वयक यांनी संगनमत करून या भरती प्रकियेत घोळ केल्याचे सांगण्यात यातून समोर येत आहे. त्यामुळे जि.प.तील आपले सरकारचे जिल्हा समन्वयक आणि संबंधित परिक्षा घेणारी सीएससी एजन्सी यांनी यात फेरफार केल्याची चर्चा आहे.

 

सीएसएस कंपनीमार्फत कंत्राटी स्वरूपात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या संगणक ऑपरेटर पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना संगणक ऑपरेटर संबंधित कंपनी पुरविते. त्यामुळे ऑपरेटर निवडीशी संबंधित बाब त्या कंपनीचीच आहे.

– अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.पं. विभाग, जि.प.जळगाव