आमदार सुरेश भोळे: कोळी समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईतील बैठकीत सकारात्मक निर्णय

जळगाव: विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. याबाबत मुंबईत मुख्यमंत्र्याच्या अध्यक्ष्ातेखाली बैठक झाली असून त्यात मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.

आमदार सुरेश भोळे यांनी उपोषस्थळी भेट देत कोळी समाजाच्या मागण्यांसाठी राजकारणाच्या पलीकडे जात आम्ही सर्वच जण समाजासोबत आहोत. लवकरच याबाबत बैठक होऊन समस्या सोडविण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार कोळी समाजातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रयत्न सुरू होते.

मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने आमदार सुरेश दामू भोळे यांच्या प्रयत्नांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार  यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर रोजी आदिवासी कोळी समाजाला जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळणे व इतर मागण्यांवर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कोळी समाजासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. ही बाब कोळी समाजाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची असून यामुळे कोळी समाज बांधवांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.