IPL 2024: देशभरातील क्रिकेटप्रेमी आयपीएल सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षातील आयपीएलचा हंगाम जवळ आला आहे. पण अश्यातच गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. पदार्पणानंतर पहिल्या दोन हंगामात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या गुजरात टायटन्स या संघासाठी खेळणारा भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी या वर्षी आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे.
मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. या स्पर्धेत त्याने कमी सामने खेळून सर्वाधिक गडी बाद केले होते. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं आहे. शमी हा गुजरात टायटन्स संघातील प्रमुख गोलंदाज आहे. गेल्या हंगामात गुजरातला स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचवण्यात शमीने मोलाची भूमिका बजावली होती.
शमीने आयपीएल मध्ये ११० सामन्यात १२७ विकेट घेतल्या आहेत. ११ धावांत ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये गुजरातच्या आधी तो कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअर डेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळला होता. बीसीसीआयमधील एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली कि, शमीच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली असून त्याच्यावर लंडन येथे शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तो या वर्षी आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. यामुळे आता गुजरात टायटन्स ला आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे.