मराठा आरक्षण देणाराच…… मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्ट भूमिका

मुंबई: मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केले जाणार आहे. यासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी 1 लाख 40 हजार लोकं तीन शिफ्टमध्ये काम करतायत. तसेच, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे, त्यामुळेच सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तर, मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम असून, कालही आमची तीच भूमिका होती आणि आजही तीच भूमिका असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मनोज जरांगे यांच्यासोबत ज्या काही चर्चा होत आहे, त्या सकारात्मक होत आहेत. त्यामुळे हे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मराठा समाजाला सोयीसुविधा देण्याबाबतीत सरकार हात आखडता घेणार नाही. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता हा निर्णय सरकार घेणार आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम देखील मोठ्याप्रमाणात सुरू आहे. यासाठी शिंदे समिती काम करत आहे. जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. मात्र, सरकार सकारात्मक आहे, त्यामुळेच सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तमाम मराठा समाजाला माझा आवाहन आहे की, हे सरकार तुमचंच आहे, असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.