राज्यातील वाढते रस्ते अपघात पाहता रस्त्यांवर वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच आरटीओच्या ताफ्यात तब्बल 187 इंटरसेप्टर वाहनांची तैनाती केली. या इंटरसेप्टर वाहनांमध्ये वाहनांचा वेग मोजणार स्पीडगन देखील असल्याने बेफाम वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यास मदत मिळणार आहे.
राज्यातील परिवहन विभागाने अलिकडेच 187 इंटरसेप्टर वाहने आरटीओच्या वायूवेग पथकाच्या ताब्यात सोपविण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. आता या 187 इंटरसेप्टर वाहनांसाठी ड्रायव्हरची गरज असल्याने त्यांची भरती आता एसटी महामंडळातून केली जाणार आहे.
आता या वाहनांवर एसटी महामंडळातील एकूण 642 वाहन चालकांना नियुक्तीवर पाठविले जाणार आहे. सद्यस्थितीत 451 चालकांना जिल्हानिहाय प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रतिनियुक्ती दिली जाणार आहे. रा.प. महामंडळाकडून देय होणारे वेतन, भत्ते तसेच त्यांची सेवाज्येष्ठता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलती रा.प.नियमाप्रमाणे लागू राहणार आहेत.