आर्थिक विषयावरील दिवाळी विशेषांक प्रकाशित करून जळगाव तरुण भारत कडून मोठी जनजागृती ; उपमुख्यमंत्री फडणवीस 

‘जळगाव : जगातील ‘आर्थिक अस्थिरता अपवाद मात्र भारताचा’ या अतिशय अत्यावश्यक विषयावर दिवाळीचा खास विशेषांक प्रकाशित करून ‘जळगाव तरुण भारत’ने जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी मुंबईत झालेल्या प्रकाशन समारंभात केले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात ‘जळगाव तरुण भारत’च्या राष्ट्रीय बाण्याचे कौतुक केले. भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या तुलनेत सुदृढतेकडे वाटचाल करीत आहे, या विषयीची सविस्तर माहिती पत्रकारांनी वेळोवेळी वाचकांपर्यंत पोहोचावी, असे आवाहनही त्यांनी केले.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ‘जळगाव तरुण भारत’ने दरवर्षी प्रकाशित केलेल्या राष्ट्रीय विचारांच्या दिवाळी अंकांचे कौतुक केले. यंदाचा आर्थिक विषयावरील दिवाळी अंक अतिशय माहितीपूर्ण असून, ‘जळगाव तरुण भारत’ने तो हिंदी भाषेत प्रकाशित करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक आणि स्वागत ‘जळगाव तरुण भारत’चे सचिव संजय नारखेडे यांनी केले. सर्जना मीडिया सोल्यूशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा यांनी ‘जळगाव तरुण भारत’च्या कार्याची आणि केशवस्मृती प्रतिष्ठान परिवाराची माहिती दिली.

‘जळगाव तरुण भारत’चे सहसचिव विभाकर कुरंभट्टी यांनी तरुण भारतने यंदा प्रकाशित केलेल्या आर्थिक विषयावरील दिवाळी अंकाच्या विषयाची आणि निर्मितीची माहिती दिली. प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

‘जळगाव तरुण भारत’चे संपादक चंद्रशेखर जोशी यांनी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अधिकाधिक वाचकांपर्यंत तरुण भारत पोहोचत असल्याची आणि त्याद्वारे विकास योजना प्रसारीत करीत असल्याची माहिती दिली.

व्यवस्थापक मनोज महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच उपस्थित वाचकांचे आभार मानले.