आर बी आय ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल ६,२७,९०,४५,००,००० किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात कोठे ठेवणार हा राष्ट्रीय खजिना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ब्रिटनमधून १०० टनाहून अधिक सोनं परत आणलं आहे आणि ते आपल्या राखीव निधीमध्ये हस्तांतरित केलं आहे. बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी महिन्यात पुन्हा एकदा इतक्याच प्रमाणातील सोनं देशात आणलं जाऊ शकतं. १९९१ मध्ये गहाण ठेवण्यात आलेलं हे सोनं पहिल्यांदाच आरबीआयच्या निधीत सामील करण्यात आलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे सुरक्षित ठेवलं आहे. यापैकी सुमारे एक तृतीयांश साठा देशांतर्गत ठेवण्यात आला आहे. ब्रिटनमधून सोनं भारतात आणल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेला स्टोरेज कॉस्ट वाचविण्यात मदत होईल, जी बँक ऑफ इंडियाला दिली जाते.

१९९१ मध्ये गहाण ठेवण्यात आलं होतं सोनं
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून जारी करण्यात आलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत केंद्र सरकारकडे विदेशी चलन राखीव निधीच्या रुपात ८२२.१० टन सोनं होतं, जे मागील वर्षी याच काळात ७९४.६३ टनपेक्षा अधिक होतं. १९९१ मध्ये, चंद्रशेखर सरकारने पेमेंट बॅलन्सच्या संकटाचा सामना करण्यासाठी सोनं गहाण ठेवलं होते. ४ ते १८ जुलै १९९१ दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ४०० मिलियन डॉलर्स उभारण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान यांच्याकडे ४६.९१ टन सोनं गहाण ठेवलं होतं.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी
आरबीआयने जवळपास १५ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीक़डून २०० टन सोनं खरेदी केलं होतं. २००९ मध्ये युपीए सरकारच्या कार्यकाळात जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा भारताने आपल्या मालमत्तेत विविधता आणण्यासाठी 6.7 अब्ज डॉलर्स किमतीचं २०० टन सोनं खरेदी केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून आरबीआयकडून खरेदी करण्यात आलेल्या स्टॉकमध्ये वाढ झाली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून सोने खरेदी कऱण्याचं कारण काय?
महागाई दर आणि परकीय चलन जोखमींविरूद्ध बचाव म्हणून परकीय चलन मालमत्तेचा आधार वैविध्यपूर्ण करणं हा सोनं खरेदी करण्याचा आरबीयचा मुख्य उद्देश आहे. आरबीआयने डिसेंबर २०१७ पासून बाजारातून नियमितपणे सोनं गोळा करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यातील सोन्याचा वाटा डिसेंबर २०२३ अखेर ७.७५ टक्क्यांवरून एप्रिल २०२४ अखेर ८.७ टक्क्यांपर्यंत वाढेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून सोनं कुठे ठेवलं जातं?
आरबीआय सोनं मुंबईतील मिंट रोड स्थित आरबीआय भवन तसंच नागपूरमधील तिजोरींमध्ये ठेवतं. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार, जागतिक मध्यवर्ती बँकांकडे आतापर्यंत उत्खनन केलेल्या सोन्यापैकी सुमारे १७ टक्के सोने आहे आणि २०२३ च्या अखेरीस साठा ३६,६९९ मेट्रिक टन पेक्षा जास्त होईल.