मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावरुन मविआतील घटक पक्षांना चांगलंच अडकून ठेवलं आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना खुलं पत्र लिहून जागा वाटपावरुन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे .
आव्हाडांचे पत्र
मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून म्हणजेच आपणांकडे पाहिले जात आहे.
आपणांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे अन् त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे.
जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करुया !
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.!