आसोदा सार्वजनिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत

आसोदा : भारतीय जनमानसामध्ये शिक्षणाचे महत्त्व अधिकाधिक असून शिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांमधून पालकांनी आपल्या पाल्यांचा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्यासाठी ज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शाळा प्रवेशोत्सवानिमित्त आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या काळानुरूप शिक्षणाचा स्तर बदलतो आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणत वैज्ञानिक दृष्ट्या येणाऱ्या अनेक आव्हानांना आपल्या ज्ञानाच्या बळावर तोंड देत देशहितासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी मत मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. ते याप्रसंगी बोलताना म्हणाले, आजचा बालक उद्याचा पालक आहे. त्यांनी ज्ञान आणि आपल्या अभ्यासपूर्ण अशा व्यक्तिमत्त्वाला घडवाव्यात. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत एक आदर्श विद्यार्थी म्हणून समाजात स्थान प्राप्त करण्यासाठी शासनाच्या असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेत प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले.
प्रमुख अतिथी कल्पना चव्हाण यांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत पुस्तके वाटप करण्यात आले. याप्रसंगी विचार मंचावर विद्यालयाचे पर्यवेक्षक एल. जे. पाटील, डी.जी. महाजन, मंगला नारखेडे उपस्थित होते. याप्रसंगी प्रज्ञा कापडणे व समर्थ चौधरी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक एल. जे. पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय वृषाली चौधरी यांनी करून दिला,. सूत्रसंचालन संतोष कचरे, आभार शुभांगीनी महाजन यांनी मानले.