इंजिनीअरिंगमध्ये आता मराठी सक्तीची, राज्य शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई:  राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंग शाखेतही मराठी सक्तीची करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पहिली ते दहावीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली होती. त्यातच आता इंजिनीअरिंग शाखेतही मराठी सक्तीचा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वाशीत सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलन-२०२४ च्या व्यासपीठावरून ही घोषणा केली.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील उपस्थित होते. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रावर तीन दिवसीय विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाला राज ठाकरे यांनी नुकतीच हजेरी लावली. संमेलनात मराठीच्या सद्यःस्थितीवर त्यांनी भाष्य केले तसेच हिंदी भाषेबद्दलची वस्तुस्थितीदेखील सांगितली. मराठी या विषयावर मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो. मी कडवट मराठी आहे. माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. मराठी विषयावर आंदोलन केली, तुरुंगात गेलो.

जून महिन्यात अमेरिकेत मला महाराष्ट्र मंडळाने निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेत मराठी शाळा उघडतात, हे काय कमी आहे, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. यानंतर आपल्या भाषणात केसरकर यांनी राज ठाकरेंची स्तुती केली. केसरकर म्हणाले की, राज ठाकरेंना सांगण्यास मला मनापासून आनंद होतोय की यावर्षीपासूनच आम्ही पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली आहे. त्याचबरोबर आता इंजीनीअरिंगमध्येही मराठी सक्तीची करीत असल्याची घोषणा करतो.