नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची झालेली चौथी बैठकही जागावाटप आणि नेतृत्वाच्या घोषणेशिवाय पार पडली आहे. त्याचवेळी खासदारांच्या निलंबनाविरोधात आघाडीतर्फे २२ डिसेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली देशातील २८ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा बैठक देशाची राजधानी दिल्ली येथे पार पडली. सुमारे ३ तासांहून अधिक काळ चाललेल्या आघाडीच्या या चौथ्या बैठकीतदेखील आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप आणि आघाडीचे नेतृत्व कोण करणार, या मुद्द्यावर उत्तर सापडलेले नाही. इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावे, असा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडला.
बैठकीनंतर आघाडीतर्फे मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीविषयीची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. इंडिया आघाडीस प्रथम मोठ्या संख्येने खासदार निवडणून आणण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यानंतर बहुमत प्राप्त झाल्यास पंतप्रधानपदाविषयी चर्चा करू, असे खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे या बैठकीत जागावाटपाविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे.